०१ / ०६
मराठी दिवाळी अंकांचा डिजिटल वारसा

दिवाळी अंकांचा समृद्ध वारसा, नव्या युगाची नवी दिशा!

११७ वर्षांची साहित्य परंपरा जपण्याचा आणि मराठी सर्जनशीलतेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचा एक अभिनव उपक्रम.

दिवाळी अंकांची परंपरा यंदा ११७ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा गाठत आहे. या काळात दिवाळी अंकांनी केवळ साहित्यनिर्मिती केली नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीतही महत्त्वाचे योगदान दिले. नवीन कथा, कविता, विनोदी लेख, व्यंगचित्रे आणि विचारप्रवर्तक लेखांची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या कित्येक पिढ्या या परंपरेने घडवल्या.

आज गरज आहे ती या वारशाचे जतन करण्याची, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची आणि जगभरातील मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याची. याच व्यापक विचारातून साकारत आहे एक नवा उपक्रम – ‘अंकालय’!

मराठी दिवाळीची ओळख

दिवे, रांगोळी, फराळ… आणि दिवाळी अंक!

दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते लखलखते दिवे, रांगोळ्या, फराळ आणि आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी! पण मराठी माणसाच्या दिवाळीला आणखी एक अनोखी सांस्कृतिक ओळख आहे, ती म्हणजे ‘दिवाळी अंक’!

दिवाळीच्या सुट्टीत घराच्या अंगणात निवांत बसून दिवाळी अंक वाचण्याचा आनंद काही वेगळाच! आवडत्या लेखकांच्या नवीन साहित्याची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या कित्येक पिढ्या या परंपरेने घडवल्या. यंदा ही परंपरा ११७ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा गाठत आहे.

नवीन साहित्याची उत्सुकता

कथा, कविता, विनोदी लेख, व्यंगचित्रे आणि विचारप्रवर्तक लेख.

फराळ संपला तरी वाचन सुरूच

अंकातील कथा, विचार आणि चर्चा अनेक दिवस रंगत.

एका घरातून अनेक घरांत

एकच अंक महिनोंमहिने वाचकांच्या हातातून फिरत असे.

घराघरांत छोटी ग्रंथालये

वाचलेले अंक जपून ठेवले जात आणि संग्रह तयार होत.

दिवाळीच्या दिव्यांनी घर उजळले, तर दिवाळी अंकांनी मराठी मन आणि विचारविश्व उजळवले!
१९०९पहिला दिवाळी अंक – ‘मनोरंजन’
११७ वर्षेदिवाळी अंक परंपरेचा ऐतिहासिक टप्पा
३००–४००अंक दरवर्षी प्रकाशित (२०२३ मधील वृत्तानुसार)
८अंकालयचे प्रमुख विभाग
०१ परंपरा आणि इतिहास

१९०९ : ‘मनोरंजन’पासून सुरू झालेली परंपरा

संपादक काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी ‘मनोरंजन’ मासिकाचा दिवाळी विशेषांक प्रसिद्ध केला आणि मराठी साहित्यविश्वात एका नव्या सांस्कृतिक परंपरेचा पाया घातला. त्या काळात एकाच विशेषांकातून कथा, कविता, नाटक, विनोद, चित्रे आणि वैचारिक लेखन वाचकांपर्यंत पोहोचवणे ही अभिनव कल्पना होती. वाचकांचा प्रतिसाद मिळाला आणि पाहता पाहता दिवाळी अंक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले.

इतिहास पान

एकाच अंकात सर्व काही

कथा, कविता, नाटक, विनोद, चित्रे आणि वैचारिक लेखन – त्या काळातील अभिनव कल्पना.

नवोदितांना पहिली संधी

नव्या लेखकांना व्यासपीठ आणि प्रस्थापित साहित्यिकांच्या नव्या साहित्याला वाचक.

विषयांचे वैविध्य

स्त्रीलेखन, ग्रामीण साहित्य, विनोद, विज्ञान, कला, इतिहास आणि समाजकारण.

काळाचा आरसा

मुखपृष्ठे, जाहिराती आणि व्यंगचित्रांतून त्या त्या काळातील महाराष्ट्र दिसतो.

मौजदीपावलीआवाजदीपलक्ष्मीमेनकामाहेरआणि इतर अनेक…
०२ अंकालय म्हणजे काय?

दिवाळी अंकांचा डिजिटल ठेवा

महाराष्ट्राच्या ११७ वर्षांच्या दिवाळी अंक परंपरेचे संकलन, जतन, संशोधन आणि प्रसार करणारे – आणि या परंपरेला जागतिक पातळीवर बळ देणारे व्यापक व्यासपीठ.

सन १९१० मधील दुर्मीळ दिवाळी अंक आज कुठे सापडेल?
वडिलांनी १९६० च्या अंकात लिहिलेली कथा नातवंडांना कशी वाचायला मिळेल?
त्या काळातील मुखपृष्ठे, जाहिराती आणि चित्रे कशी होती?

डिजिटल अंक संग्रह

१९०९ पासूनचे अंक – वर्ष, विषय आणि प्रकाशकनिहाय शोध.

दुर्मीळ अंकांचे जतन

जीर्ण होत चाललेल्या अंकांचे डिजिटल संवर्धन.

संपादक व साहित्यिक

संपादक, प्रकाशक, लेखक, चित्रकारांच्या योगदानाची माहिती.

संशोधनाचे व्यासपीठ

लेख, शोधनिबंध, पीएच.डी. प्रबंध आणि ऐतिहासिक संदर्भ.

पुरस्कार आणि सन्मान

गौरवलेले अंक, पुरस्कार आणि पुरस्कारप्राप्त संपादक.

दृश्यसाहित्य संग्रहालय

दुर्मीळ मुखपृष्ठे, व्यंगचित्रे, रेखाटने आणि जुन्या जाहिराती.

नव्या पिढीसाठी साहित्य

अभिवाचन, ध्वनिपुस्तके, भाषांतर आणि डिजिटल वाचन.

साहित्यातून नवनिर्मिती

ऑरेंज इकॉनॉमी आणि WAVES सारख्या व्यासपीठांवर सहभाग.

केवळ जुन्या दिवाळी अंकांची डिजिटल ग्रंथालयात मांडणी करणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नाही. दिवाळी अंकांच्या माध्यमातून निर्माण झालेली साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सर्जनशील परंपरा एका ठिकाणी आणणे व ह्यातून नव्या व्यावसायिक संधी उभ्या करणे हा त्यामागचा प्रमुख विचार आहे. संपादकांच्या मुलाखती, आठवणी, हस्तलिखिते आणि प्रकाशनप्रवास यांचेही दस्तऐवजीकरण व्हावे, हा महत्त्वाचा उद्देश आहे.

अंकालय पान
०३ ऑरेंज इकॉनॉमी

एका कथेतून अनेक संधी

एखाद्या जुन्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली अप्रतिम कथा आज एखाद्या वाचकाला वाचता येईल. उद्या तिचे अभिवाचन होईल. पुढे तिचे हिंदी, इंग्रजी किंवा इतर भाषांत भाषांतर होईल आणि त्या कथेवर नाटक, लघुपट, चित्रपट किंवा वेबमालिका साकारली जाऊ शकेल.

वाचन

आजच्या वाचकापर्यंत

अभिवाचन

पॉडकास्ट, ऑडिओबुक

भाषांतर

हिंदी, इंग्रजी व इतर भाषा

रूपांतर

नाटक, लघुपट, चित्रपट, वेबमालिका

रोजगार

अनेक सर्जनशील व्यावसायिकांना काम

चित्रपट

‘श्वास’

माधवी घारपुरे यांची दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कथा अरुण नलावडे यांच्या वाचनात आली आणि संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ चित्रपट साकारला. आजोबा आणि दृष्टी गमावण्याच्या उंबरठ्यावरील नातवाच्या या कथेला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘सुवर्णकमळ’ मिळाले आणि २००४ मध्ये ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली.

दिवाळी अंक चित्रपट ऑस्कर
नाटक

‘कुसुम मनोहर लेले’

विनिता ऐनापुरे यांची ‘नराधम’ ही लघुकादंबरी १९८९ च्या ‘सुवासिनी’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. पुढे ती पुस्तकरूपात आली आणि याच साहित्यावर आधारित अशोक समेळ लिखित ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक रंगभूमीवर आले – नव्वदच्या दशकात मोठे व्यावसायिक यश मिळवणाऱ्या मराठी नाटकांपैकी एक.

दिवाळी अंक पुस्तक रंगभूमी
ध्वनिसाहित्य

‘मेनका क्लासिक्स’

हा प्रवास डिजिटल माध्यमांतही सुरू झाला आहे. ‘मेनका क्लासिक्स’ या पॉडकास्टमध्ये ‘मेनका’, ‘माहेर’ आणि ‘जत्रा’ यांच्या मासिकांत व दिवाळी अंकांत पूर्वी प्रकाशित झालेले निवडक साहित्य ध्वनिरूपात उपलब्ध आहे – जुन्या साहित्याला नव्या माध्यमातून नवे श्रोते मिळवून देणारे प्रत्यक्ष उदाहरण.

दिवाळी अंक पॉडकास्ट

म्हणून दिवाळी अंकांचे आर्थिक मूल्य केवळ अंक विक्रीपुरते मोजता येणार नाही. त्यात प्रकाशित झालेले साहित्य पुढील सर्जनशील निर्मितीचे बीज ठरू शकते. साहित्य ते चित्रपट, ध्वनिसाहित्य, अनुवाद, चित्रकला, बालसाहित्य, डिजिटल वाचन आणि सांस्कृतिक पर्यटन – या प्रत्येक उपक्रमासाठी कॉपीराइट, रूपांतर हक्क, परवानगी आणि मानधनाची पारदर्शक व्यवस्था आवश्यक असेल.

ऑरेंज इकॉनॉमी पान
०४ WAVES आणि दिवाळी अंक

मराठी कथा, जागतिक व्यासपीठावर

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकारातून सुरू झालेल्या World Audio Visual & Entertainment Summit (WAVES) ची पहिली परिषद १ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईत झाली. ‘Connecting Creators, Connecting Countries’ ही संकल्पना भारतातील सर्जनशीलतेला जागतिक बाजारपेठेशी जोडणारी ठरली. दिवाळी अंकांतील शंभर वर्षांहून अधिक काळाचा कथांचा ठेवा अशा व्यासपीठांवर मांडल्यास नव्या संधी निर्माण होऊ शकतात.

पुढील काळात ‘Marathi Diwali Ank – 117 Years of Storytelling’ या संकल्पनेवर विशेष दालन उभारण्याचा प्रस्ताव आहे.

WAVES पान
१–४ मे

२०२५, मुंबई – पहिली WAVES परिषद

३,०००+

WAVES Bazaar मधील व्यावसायिक बैठका

₹१,३२८ कोटी+

मूल्याचे व्यवहार नोंदवले गेले

११७

वर्षांचा कथांचा ठेवा – जगासमोर मांडण्यासाठी

स्रोत: केंद्र सरकारने दिलेली WAVES २०२५ ची माहिती.

संग्रहातून

परंपरा घडवणारे दिवाळी अंक

संपूर्ण संग्रह

मुखपृष्ठे प्रतीकात्मक आहेत. परवानाधारक मूळ मुखपृष्ठे श्रेयनिर्देशासह समाविष्ट केली जातील.

या वर्षी लक्ष्मीपूजनात सरस्वतीलाही पुजूयात!

दिवाळी अंक आणूयात, दिवाळी अंक वाचूयात!

महाराष्ट्रीय घरातील दिवाळीची तयारी – किल्ला, आकाशदिवा, फराळ, रांगोळी, नवे कपडे. प्रत्येकजण कामात गुंतलेला; सगळ्या गोष्टी असूनही एकत्र बसून हसण्या-बोलण्याचा आनंद मात्र बाकी. मग आजोबा रंगीबेरंगी दिवाळी अंक घेऊन येतात, गोष्टींची मैफल रंगते आणि दिवाळी अंकाच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येऊन सण खऱ्या अर्थाने खुलतो.

०५ सहभाग

आपला दिवाळी अंक, आपला वारसा – चला, एकत्र जतन करूया!

संपादक, प्रकाशक आणि संग्राहकांना आवाहन

जुने अंक काळाच्या ओघात जीर्ण होत आहेत; काही अंकांच्या प्रती उपलब्ध नाहीत, तर काही केवळ खाजगी संग्रहांमध्ये आहेत. आपल्याकडील डिजिटल प्रती, पीडीएफ फाइल्स, जुन्या अंकांचे स्कॅन, मुखपृष्ठे आणि संपादकीय माहिती अंकालयसाठी उपलब्ध करून द्या. प्रत्येक अंकाला योग्य श्रेय दिले जाईल आणि कॉपीराइटचा पूर्ण आदर राखला जाईल.

‘अंकमित्र’ व्हा!

आपल्या घरात किंवा आजी-आजोबांच्या कपाटात एखादा जुना दिवाळी अंक आजही जपून ठेवलेला असेल; गावातील जुन्या वाचनालयात दुर्मीळ अंकांचा संग्रह असेल. ‘अंकमित्र’ म्हणून अंकशोध, नोंद, संग्राहकांशी संपर्क आणि इतिहास संकलनात सहभागी व्हा – प्रत्येक जिल्ह्यात अंकमित्र, प्रत्येक गावात अंकशोध!

०६ पुढील वाटचाल

वारसा जतनापासून जागतिक ओळखीपर्यंत

१

नोंदणी आणि माहिती

संपादक, प्रकाशक, संग्राहकांची नोंदणी; अंकांची वर्षनिहाय माहिती.

२

डिजिटल जतन

दुर्मीळ अंकांचे जतन, संशोधनासाठी वर्गवारी, परवानगीनुसार डिजिटल प्रवेश.

३

नवे वाचक

अभिवाचन, भाषांतर, डिजिटल प्रदर्शन आणि शैक्षणिक उपयोग.

४

जागतिक संधी

ऑरेंज इकॉनॉमी, WAVES आणि जागतिक साहित्यिक व्यासपीठांशी सहकार्य.

अंकालयची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्याची आवश्यकता आहे. या वाटचालीत महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य आणि संबंधित विभाग, साहित्यिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, प्रकाशक, तंत्रज्ञान क्षेत्र आणि मराठी समाज यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल. व्यवस्थित दस्तऐवजीकरणातून पुढे युनेस्कोच्या ‘Memory of the World’ सारख्या जागतिक मान्यतेच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते.

एक दिवाळी अंक… अनेक पिढ्यांचा वारसा!

दिव्यांचा प्रकाश काही काळानंतर मंदावतो; पण साहित्याचा प्रकाश पिढ्यान्‌पिढ्या उजळत राहतो.

आज आपल्या हातात असलेला एखादा दिवाळी अंक उद्या इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरू शकतो. आजोबांनी जपून ठेवलेल्या अंकातील कथा उद्या नातवंडांना वाचता येऊ शकते; छोट्याशा गावातून प्रकाशित झालेला दिवाळी अंक जगभरातील संशोधकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणूनच अंकालय हा केवळ एक डिजिटल प्रकल्प नाही, तर ११७ वर्षांच्या साहित्यिक वारशाला नवसंजीवनी देण्याचा सामूहिक संकल्प आहे.

अंकालय — दिवाळी अंकांचा वारसा, मराठी साहित्याचा जागतिक प्रवास!

सहभागी व्हा संपर्क साधा